भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश २०० प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे. हे ड्रोन विरोधी शस्त्र आहे. या सिस्टिमद्वारे दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश २०० प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.

बंदुक किंवा मशीन गनवर ‘स्मॅश २०० प्लस’ सिस्टिम बसवता येईल. पुढच्यावर्षीपासून ‘स्मॅश २०० प्लस’ सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल. ‘स्मॅश २०० प्लस’ची किंमत १० लाखापेक्षा कमी आहे. बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून १२० मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता येईल.

अलीकडच्या काही वर्षात छोटया ड्रोन्समुळे धोका वाढला आहे. अनेक छोटी ड्रोन्स थव्याच्या स्वरुपता एकाचवेळी सीमेच्या दिशेने येत असतील, तेव्हा ते जास्त खतरनाक ठरु शकते. झुंडीच्या स्वरुपात पाठवलेली ड्रोन्स शत्रुचे हवाई सुरक्षा कवच नष्ट करु शकतात.

भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार असला, तरी अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करण्याचे काम सुरु करणार आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या DTTI द्विपक्षीय करारातंर्गत ही सिस्टिम विकसित करण्यात येईल.