स्पॉटलाइट कार्यक्रमात नितीन गडकरी यांची माहिती
नवीन रस्ते, बंदरे व विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी १ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे ६७ लाख कोटी रुपये (६७००००० कोटी) खर्च येईल, त्यामुळे ते प्रमुख आव्हान आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पॉटलाइट या राज्यसभा वाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले.
पायाभूत सुविधा सुधारणे हे भारतासारख्या आशियातील तिसरी अर्थव्यवस्था असलेल्या देशासाठी महत्त्वाचे आहे, असे सांगून ते म्हणाले, की त्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. राज्यसभेच्या स्पॉटलाइट या नवीन कार्यक्रमाच्या पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. एनडीए सरकारने भारतातील पायाभूत सुविधांवर भर देण्याचे ठरवले आहे व मूलभूत क्षेत्रात आम्ही निधी कमी पडू देणार नाही. पैसा हा प्रश्न नाही तर मानसिकता हा खरा प्रश्न आहे. दुर्दैवाने आपण नोकरशाहीचे नैतिक खच्चीकरण केले आहे. रस्ते प्रकल्पात जर नोकरशाहीचे काही अडथळे असतील तर ते दूर केले जातील, कंपनी क्षेत्र हे सरकारच्या निर्णयहीनतेचे बळी ठरते कारण अनेक परवाने घ्यावे लागतात. सरकारने बँकर्स व कंत्राटदारांशी चर्चेच्या अनेक फे ऱ्या केल्या आहेत व त्यात जमीन अधिग्रहण व इतर मुद्दय़ांवर चर्चा झाली. पुढील पाच वर्षांत देशातील पायाभूत सुविधात मोठा बदल घडवला जाईल. माझे काम मला माहिती आहे व ते मी करीत आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्याने देशांतर्गत उत्पन्नात २ टक्के भर पडणार आहे. ३१ मार्च अखेरीस आम्ही दिवसाला ३० कि.मी. चे रस्ते करण्याचे लक्ष्य गाठलेले असेल व त्यापुढे दिवसाला १०० कि.मी. रस्ते करण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी अर्थसंकल्पात माझ्या खात्याला चांगली आर्थिक तरतूद मिळेल अशी अपेक्षा आहे असे सांगून ते म्हणाले, की २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात १५ ते २० हजार कोटींची जादा तरतूद अपेक्षित आहे. चालू वर्षांतील योजनाखर्च ४५ हजार कोटी होता. जलमार्गाना प्राधान्य दिले जाईल, ४५ हजार कोटी योजनाखर्च असताना केवळ १००० कोटी जलमार्गावर खर्च करणे शक्य आहे पण यात सुधारणा होईल.