News Flash

“करोनाची लाट रोखण्यासाठी जे चीनने वर्षभरापूर्वी केलं तेच आता भारताने करावं”; डॉक्टर फौचींचा सल्ला

व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार आहेत डॉक्टर अँथनी फौची

प्रातिनिधिक फोटो (मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

अमेरिकेतील व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी रविवारी भारतावर आलेल्या सध्याच्या करोना संकटासंदर्भात भाष्य केलं आहे. करोनावर मात करायची असल्यास लसीकरण हाच एक दीर्घकालीन उपाय आहे असं फौची यांनी स्पष्ट केलं आहे. या घातक साथीचा सामना करण्यासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना प्रतिबंधक लस निर्मितीचं प्रमाण वाढवण्याची गरज असल्याचं मत फौची यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. तसेच फौची यांनी चीनने वर्षभरापूर्वी जे केलं तेच आता करण्याची भारताला गरज असल्याचा उल्लेख तात्पुरत्या रुग्णालयांसंदर्भात बोलताना केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार असणाऱ्या फौची यांनी, “या साथीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी लोकांचे लसीकरण करण्यात आलं पाहिजे. भारत जगातील सर्वाधिक लस निर्मिती करणारा देश आहे. त्यांना लस निर्मितीसाठी स्वत:च्या देशातील साधनांसोबतच जगभरातून मदत केली जात आहे,” असं सांगितलं. भारत हा सर्वात मोठा लस निर्मिती करणारा देश असल्यानेच, “इतर देशांनी भारताला लस निर्मितीसाठी मदत केली पाहिजे किंवा भारताला जास्तीत जास्त लसी दान दिल्या पाहिजेत,” असं फौची यांनी म्हटलं आहे. भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास लस निर्मितीचा वेग वाढून ती जगभरात पाठवता येईल असे संकेत यामधून फौची यांनी दिलेत.

फौची यांना मुलाखतीमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना भारतामध्ये तात्काळ स्वरुपाची रुग्णालये उभारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे करोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती तो आदर्श भारताने घेणं गरजेचं असल्याचं फौची म्हणाले. “भारताला हे करावं लागेल. रुग्णालयांमध्ये बेड्स नसल्याने तुम्ही लोकांना रस्त्यावर फिरु देऊ शकत नाही. तिथे ऑक्सिजनसंदर्भातील परिस्थितीही अंत्यंत नाजूक आहे. लोकांना ऑक्सिजन मिळत नाही हे दुर्दैवी आहे,” असं मत फौची यांनी व्यक्त केलं आहे. तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, पीपीई किट आणि आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत असं मत फौची यांनी नोंदवलं.

भारतात देशव्यापी लॉकडाउनची गरज असल्याचा पुनरुच्चार फौची यांनी केलाय. संसर्गजन्य रोग क्षेत्रात तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या फौची यांनी सांगितले की, भारतातील परिस्थिती गंभीर आहे हे आता सर्वाना कळून चुकले आहे. जेव्हा जास्त लोकांना संसर्ग होत असतो तेव्हा त्यांची पुरेशी काळजी घेणेही गरजेचे असते असं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. भारताने संपूर्ण लॉकडाउन लागू केला तरच हा प्रश्न सुटू शकेल, असं फौची यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. गेल्या वर्षी चीनने तेच केले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इतर देशांनी मर्यादित प्रमाणात का होईना लॉकडाउन केला. तुम्हाला त्यासाठी सहा महिने लॉकडाउन ची गरज नाही केवळ काही आठवडे लॉकडाउन केला तरी त्याचा परिणाम दिसून येईल. लॉकडाउनमुळे विषाणूच्या प्रसाराला अटकाव होत असतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटते, असं डॉ. फौची म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 10:12 am

Web Title: india needs to immediately build makeshift field hospitals like china dr anthony fauci scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाबळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर; २४ तासांत ३,७५४ मृत्यू
2 Corona Vaccine: स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल
3 शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यास जात असलेल्या सामाजिक कार्यकर्तीवर बलात्कार
Just Now!
X