दोन देशांमधील सामायिक सीमाप्रश्नावर तसेच अन्य संरक्षणविषयक बाबींवर चर्चा करण्यासाठी भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या गृहसचिवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय चर्चेसाठी भारताचे केंद्रीय गृहसचिव आर.के.सिंग आणि नेपाळचे गृहसचिव नवीन कुमार घिमिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळे सहभागी झाली आहेत.
नेपाळी सैन्याची क्षमता वाढविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, मात्र त्याबरोबरच नेपाळनेही भारताच्या संरक्षणविषयक अपेक्षांची पूर्तता करावी, असा आग्रह भारतीय शिष्टमंडळातर्फे धरण्यात येणार आहे. या चर्चेसाठी भारतातर्फे १३ सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी झाले असून, अन्य विषयांबरोबरच बनावट नोटा आणि अवैध मार्गाने केला जाणारा व्यापार-उदीम यांचाही चर्चेत समावेश आहे.