पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्न सोडवण्यास सहकार्य करीत नाहीत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी भारतात आले असताना पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज व सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी हा विषय पुन्हा एकदा फोडणीला टाकला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून भारत पाकिस्तानात हल्ले करीत आहे असा आरोपही पाकिस्तानने केला.
मागील सरकारची भूमिका जरा तरी मवाळ होती असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने भारताशी चांगले संबंध ठेवावे असे वाटत असेल तर भारताने काश्मीर प्रश्नावर तडजोड करावी. भारताला त्यांच्या स्वत:च्या अटीवर चर्चा हवी आहे पण पाकिस्तानला त्या अटी मान्य नाहीत. अफगाणिस्तानातील भूमीचा वापर करून भारत पाकिस्तानात हल्ले करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानातील हल्ल्यात भारत अफगाणिस्तानच्या भूमीतून कारवाया करीत आहे असे त्यांनी डॉन या वृत्तपत्राला सांगितले.
भारताच्या पाकिस्तानविरोधी कारवाया पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या संयुक्त धोरणामुळे कमी झाल्याचे त्यांनी मान्य केले. अफगाणिस्तानचा वापर करून भारत पाकिस्तानला अस्थिर करीत असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, बलुचिस्तानातील अशांततेस भारत जबाबदार आहे. चांगले व वाईट तालिबान असा फरक करता येणार नाही, सुरक्षा दले कुठलाही भेदभाव न ठेवता त्यांच्यावर कारवाई करीत आहेत.