पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी भारत पुढेच येत नसून, त्यांच्या या हेकेखोर वृत्तीमुळे दोन्ही देशांमधील चर्चेला खीळ बसली असल्याचे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील स्थगित झालेल्या चर्चेला लोधी यांनी संपूर्णपणे भारतालाच जबाबदार ठरवले आहे. अमेरिकेतील लष्करी महाविद्यालचे स्नातक आणि प्राध्यापकांसमोर केलेल्या भाषणात लोधी यांनी हे आरोप केले.
भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक दिशेने चर्चेला सुरुवात झाली होती. पण भारताने अस्वीकारार्ह अटी लादून चर्चेला खीळ घातली. पाकिस्तानकडून वारंवार सर्वसमावेशक चर्चेसाठी भारताकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. पण या चर्चेसाठी भारत पुढेच येत नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील बोलणी पुन्हा पूर्ववत होण्यात अडथळे येत आहेत आणि त्याला भारताची हेकेखोर वृत्तीच जबाबदार आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या राजदूत कार्यालयाकडून काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दहशतवादाचा बिमोड करणे, अर्थव्यवस्थेची गती वाढवणे आणि शेजारी देशांसोबत शांततापूर्ण संबंध ठेवण्याला पाकिस्तानचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर भारतासोबतच्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करून संबंध पूर्ववत करणे यालाही पाकिस्तान प्राधान्य देतो. पाकिस्तानच्या या धोरणांमधून आमची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी स्पष्ट होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.