‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : देश करोना विषाणू साथीशी सर्वशक्तीनिशी लढत असल्याचे नमूद करीत, प्राणवायूचे उत्पादन दहा पटीने वाढवण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.

करोनासाथीच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांपुढे प्राणवायूच्या तुटवडय़ाचे संकट उभे राहिले. प्राणवायूअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्या अनुषंगाने पंतप्रधान म्हणाले की आता प्राणवायूचे उत्पादन आधीपेक्षा दहा पटींहून अधिक वाढवण्यात आले आहे. पूर्वी ते प्रतिदिन ९०० मेट्रिक टन एवढे होते, आता ते ९५०० मेट्रिक टन करण्यात आले आहे. ‘मन की बात’च्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, ‘‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे होते, पण भारतीय हवाई दल, रेल्वे, टँकरचालक यांनी अहोरात्र काम करून प्राणवायू वेळेत पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडले.’’

पंतप्रधानांनी प्राणवायूची वाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांशी संवाद साधला. प्राणवायू टँकरचे चालक दिनेश उपाध्याय, आक्सिजन एक्स्प्रेसच्या चालक शिरीषा गजनी आणि हवाई दलातील कॅप्टन पटनायक यांनी बजावलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले.  त्याबद्दल मोदी म्हणाले, ‘‘करोना संकट काळात आम्ही सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा सार्थ केली. संकट काळात एका महिला रेल्वेचालकाने प्राणवायूचे टँकर पोहोचवण्याचे, तर हवाई दलातील महिला अधिकाऱ्याने प्राणवायूची वाहतूक वेळेत केली. त्यांनी अहोरात्र काम करून प्राणवायूचा पुरवठा केला.’’ करोना साथीच्या संकटातही शेतक ऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे, सरकारनेही अन्नधान्य खरेदीचा विक्रम केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

करोना साथीमुळे अनेक लोकांचे बळी गेले. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला. आता भारत इतर देशांच्या दबावाखाली मार्गक्रमण करू इच्छित नाही. त्यासाठी आमच्या काही धारणा तसेच मूल्यतत्त्वांच्या आधारे मार्गक्रमण केले जाईल. आमच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या देशांना आम्ही सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. भारत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर तडजोड करीत नाही हे सिद्ध झाले आहे. लष्करी दलांचे सामथ्र्य वाढले असून आपण योग्य मार्गावर आहोत याचा प्रत्यय येत आहे. अनेक जुने वाद मिटले आहेत. शांतता आणि सुसंवाद आहे. शांतता आणि विकासामुळे ईशान्येपासून काश्मीपर्यंत नवा आत्मविश्वास वाढीस लागला आहे.

सुरुवातीला देशात केवळ एकच करोना चाचणी प्रयोगशाळा होती, परंतु आता २५०० प्रयोगशाळा कार्यान्वित असल्याचे आणि दररोज २० लाखांहून अधिक करोना चाचण्या केल्या जात असल्याचे मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रकाश कंदपाल यांच्याशी संवाद साधून त्यांचे अनुभव ऐकले.

स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर ग्रामीण भागात ३.५ कोटी घरे बांधण्यात आली, तर गेल्या २१ महिन्यांत ४.५ कोटी नव्या नळजोडण्या देण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली. गरीब रुग्णांना आयुष्मान भारत योजनेमुळे नवे आयुष्य मिळाल्याचेही ते म्हणाले. ७० वर्षांत खेडय़ात वीज पोहोचल्याने लोक समाधानी आहेत. अनेक ग्रामीण भाग रस्त्याने जोडले गेले आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

भाजप सरकारच्या काळात देशाला अभिमानास्पद ठरतील असे अनेक क्षण आले, त्याचबरोबर आव्हानांनाही तोंड द्यावे लागले. राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच विकास योजनाही राबवल्या गेल्या.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

कसोटीचा काळ 

’गेल्या सात वर्षांत भारताने डिजिटल व्यवहारात आघाडी घेतली आहे. उपग्रह सोडणे, रस्ते बांधणी यात विक्रम घडत आहेत.

’करोनाच्या काळात सरकारची कसोटी लागली. या साथीने जगाला फटका बसला. अनेकांनी आपले प्रियजन गमावले. अगदी मोठे देशही या विध्वंसातून सुटले नाहीत.

’करोनाकाळात भारत सेवा व सहकार्याच्या माध्यमातून पुढे गेला. पहिल्या लाटेत आम्ही धैर्याने लढा दिला. या वेळीही भारत या लाटेवर विजय मिळवेल.