अणुसाहित्य पुरवठादार गटाचा सदस्य करून घेण्याच्या भारताच्या मागणीला स्वित्झर्लंडने सोमवारी पाठिंबा दिला. पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष युहान स्नायडर अमन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या मागणीला स्वित्झर्लंडने पाठिंबा जाहीर केला. करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचार या दोन्ही क्षेत्रातही भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन स्वित्झर्लंडने दिले आहे.
अणुसाहित्य पुरवठादार ४८ सदस्य देशांच्या गटामध्ये समावेश होण्यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबाच राहिल, असे युहान स्नायडर अमन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. करचुकवेगिरीसाठी भारतीयांकडून स्वीस बॅंकेत ठेवण्यात येणाऱ्या काळ्या पैशांवरही यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमधील बैठकीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याचबरोबर व्यापार, गुंतवणूक या क्षेत्रातही दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करण्याचे निश्चित केले.
अणुसाहित्य पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळावे, यासाठी भारत गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे. यंदा भारताने औपचारिकपणे आपला अर्जही १२ मे रोजी सादर केला आहे. ९ जून रोजी व्हिएन्नामध्ये आणि २४ जून रोजी सेओलमध्ये होणाऱ्या सदस्य राष्ट्रांच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होणार आहे.