जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असला, तरी देखील एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यावरून देशात दिवसागणिक करोनावर मात केलेल्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

जगभरातील करोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी १९ टक्के संख्या ही भारताची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

“ भारताने करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत जगात अव्वल स्थान मिळवले आहे. ४३ लाखांपेक्षा अधिकजणांनी भारतात करोनावर मात केलेली आहे. जगभरातील एकूण करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपैकी १९ टक्के संख्या ही भारतातील आहे.” असे आरोग्यमंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयकडून ट्विट करण्यात आले आहे. शिवाय, ट्विटबरोबर जगभरातील विविध देशांमधील करोनामुक्त झालेल्यांची संख्या देखील दर्शवली आहे.

Worldometers नुसार भारतानंतर करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत १८.७० टक्क्यांसह अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर, तिसऱ्या स्थानी १६.९० टक्क्यांसह ब्राझील आहे. यानंतर रशिया आणि दक्षिण अफ्रिका आहे.