भारत आणि पाकिस्तान यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण समझोता झाला असून त्यानुसार दोन्ही देशांनी नियंत्रण रेषा आणि अन्य ठिकाणी शस्त्रसंधीबाबतच्या सर्व करारांचे कटाक्षाने पालन करण्याचे ठरविले आहे, असे गुरुवारी दोन्ही देशांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे.

शस्त्रसंधीबाबतचा निर्णय भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांच्या (डीजीएमओ) स्तरावर घेण्यात आला असून तो बुधवारी मध्यरात्रीपासून अमलात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००३ मध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला होता, मात्र गेल्या कित्येक वर्षांत त्याचे तंतोतंत पालन  झालेच नाही.

डीजीएमओने प्रस्थापित हॉटलाइन संपर्क यंत्रणेद्वारे चर्चा केली आणि नियंत्रण रेषा आणि अन्य ठिकाणांच्या स्थितीचा मुक्त आणि मोकळ्या वातावरणात आढावा घेतला. सीमेवर शांतता नांदण्यासाठी आणि दोन्ही देशांसाठी हितकारक ठरणाऱ्या बाबी साध्य करण्यासाठी दोन्ही डीजीएमओंनी एकमेकांना भेडसावणारे प्रश्न आणि चिंता सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले, शांततेचा भंग होणारे प्रश्न आणि त्यामुळे होणारा हिंसाचाराचा उद्रेक याबाबतच्या प्रश्नांवर एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे.

भारत आणि पाकिस्तानने सर्व करार, समझोते आणि नियंत्रण रेषेवरील आणि अन्य सर्व क्षेत्रांत शस्त्रसंधीचे २५/२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून कटाक्षाने पालन करण्याचे ठरविले आहे, असे दोन्ही देशांनी संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे आकस्मिक स्थिती उद्भवली अथवा गैरसमज झाला तर तो हॉटलाइन संपर्क यंत्रणा आणि सीमेवरील ध्वजबैठकांद्वारे सोडविण्याचेही दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर गेल्या तीन वर्षांत शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचे १० हजार, ७५२ प्रकार घडले असून त्यामध्ये ७२ सुरक्षा कर्मचारी आणि ७० नागरिक ठार झाले, अशी माहिती अलीकडेच केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत दिली होती.

जेकेएनसी, पीडीपीकडून स्वागत

नियंत्रण रेषा आणि अन्य ठिकाणी शस्त्रसंधीचे पालन करण्याबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कराराचे जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (जेकेएनसी) आणि पीडीपीने  गुरुवारी स्वागत केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कराराचे आम्ही स्वागत करतो आणि कराराचे तंतोतंत पालन होईल अशी अपेक्षा करतो, असे जेकेएनसीने म्हटले आहे. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी व्हावी याचा जेकेएनसीने नेहमीच ठामपणे पुरस्कार केला आहे, असे पक्षाने म्हटले आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही या निर्णयाचे ट्वीटद्वारे स्वागत केले आहे. दोन्ही देशांना सीमेवरील आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार आणि रक्तपात थांबविण्याची इच्छा असेल तर त्यामधून मार्ग काढण्यासाठी चर्चा हाच एकमेव उपाय आहे, असेही मेहबूबा यांनी म्हटले आहे.