एक जबाबदार घटक म्हणून पाकिस्तानने सुरक्षा प्रश्नात जबाबदारीने वागावे तसेत भारत व पाकिस्तान यांनी त्यांच्यातील प्रश्न शांततामय मार्गाने सोडवावेत असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले, की पाकिस्तानने सुरक्षा प्रश्नांवर विशेष करून अण्वस्त्र प्रश्नांवर जबाबदारीने वागावे अशी आमची अपेक्षा आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची अमेरिकेला चिंता वाटते आहे, त्यामुळेच परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांना रमजानच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, त्यानंतर केरी यांनीही शरीफ यांना दूरध्वनी केला होता, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेचे पाकिस्तानातील संभाव्य दूत डेव्हीड हॅली यांनी सांगितले, की पाकिस्तानचे भारताबरोबरील संबंध त्या भवितव्यासाठी महत्त्वाचे असून त्यात सुरळीतपणा येणे आवश्यक आहे. प्रादेशिक हिताच्या संदर्भात या दोन देशांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे या दोन देशांत गैरसमज असणे परवडणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाका भेटीच्या वेळी केलेली वक्तव्ये व म्यानमारमध्ये जाऊन बंडखोरांवर केलेल्या कारवाईच्या वेळी इतर भारतीय नेत्यांनी केलेल्या विधानांनी दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कराचीत चकमकीत १० दहशतवादी ठार
कराची- पाकिस्तानच्या निमलष्करी दलाने मंगळवारी रात्री कराचीतील विविध भागांत छापे टाकून किमान १० दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
निमलष्करी दलाने छापे टाकले तेव्हा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन रेंजरही जखमी झाले आहेत. कथोरा परिसरात दहशतवाद्यांचा अड्डा असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानंतर तेथे छापे टाकण्यात आले त्यामध्ये सहा दहशतवादी ठार झाले. तर अन्य चार दहशतवादी मंगोपीर परिसरात ठार झाले, असे गृह विभागामार्फत सांगण्यात आले.
पोलीस आणि रेंजर यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये कराचीत छापे टाकले होते. तालिबान्यांनी पेशावरमधील शाळेवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

योगावरील दृश्यचित्रफितीस आतापर्यंत ४३ हजार हिट्स
बंगळुरू- ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज यांनी ‘प्रोयोग’ या बंगळुरू येथील संस्थेसमवेत योगावर दृश्यचित्रफीत काढली असून त्यात अनेकतेत एकता असा मुख्य विषय आहे. प्रोयोग- ‘फ्रॉम द बर्थप्लेस ऑफ योग’ ही दृश्यचित्रफीत फेसबुक, ट्विटर व यू टय़ूबवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त टाकण्यात आली होती व आतापर्यंत त्याला ४३ हजार हिट्स मिळाले आहेत. मालिका उद्योजक व प्रोयोगचे सहसंस्थापक डेव्ह बॅनर्जी यांच्या मते या दृश्यचित्रफितीला लाखो हिट्स मिळतील अशी अपेक्षा आहे. सामाजिक माध्यमांवर या दृश्यचित्रफितीची प्रशंसा झाली असून भारत ही योगाची जन्मभूमी आहे हे त्यात दाखवायचे आहे, असे केज यांनी सांगितले. ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर आपण भारताला दिलेली ही देणगीच आहे व त्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे, त्यांनी स्पष्ट केले.

पूर्व चीनमध्ये पावसामुळे चार हजार जणांना हलवले
बीजिंग- पूर्व चीनमध्ये झेजियांग प्रांतात मुसळधार पावसाने चार हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. काल दुपारी लिनन शहरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला असून अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत मात्र प्राणहानीचे वृत्त नाही. चांगुआ येथे ११५.५ मि.मी पाऊस झाला आहे. वसाहतीतील ३८३० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.