तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तेथील घडामोडींवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. तालिबाननं नेहमीच दहशतवादाला खतपाणी दिल्याचा इतिहास आहे. गेल्या दोन दिवसात आत्मघातकी हल्ल्यानंतर त्याची प्रचिती देखील आली आहे. काबूल विमानतळाजवळील स्फोटात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे तालिबानची पुढची वाटचाल आणि धोरणांकडे शेजारील राष्ट्रांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर पाकिस्ताननं तालिबानचं समर्थन केल्यानं भारताची चिंता वाढली आहे. या दोन देशांमुळे भारतातील दहशतवादी कारवाया वाढतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी भारतानं आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे भारत आणि पाकिस्ताननं आपल्या अंतर्गत लढाईसाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं तालिबानी नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझई यांनी सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच तालिबानला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध हवे असल्याचं देखील सांगितलं आहे. तालिबानचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तालिबानचे नेते स्टेनिकझई यांनी माध्यमांमध्ये अनेकदा काही गोष्टी चुकीच्या येत असतात, असं सांगितलं. “आमच्या बाजूने आम्ही कोणतंही विधान केलेलं नाही. आम्हाला आमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलं. “भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या वादात अफगाणिस्तान पडणार नाही”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. “ते अंतर्गत लढ्यात अफगाणिस्तानचा वापर करणार नाही. ते त्यांच्या सीमेवर लढू शकतात. आम्ही कोणत्याही देशाला आपल्या जमिनीचा वापर करू देणार नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तालिबानी प्रवक्त्याची मुलाखत घेणाऱ्या अफगाणी महिला अँकरनं सोडला देश

“अफगाणिस्तानमधील भारताच्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही. पण अशरफ घनींच्या कठपुतळी सरकारला असलेल्या पाठिंब्याला आमचा विरोध आहे. जर बांधकाम चालू असेल तर अफगाणच्या फायद्याचे प्रकल्प पूर्ण झाले पाहीजेत”, असं तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.