भारत आणि पाकिस्तानात पठाणकोट हल्ल्यानंतर जानेवारीपासून खुंटलेला चर्चेचा मार्ग मंगळवारी नवी दिल्लीत परराष्ट्र सचिव भेटीने खुला झाला असला तरी या दीड तासांच्या चर्चेत दोन्ही देशांनी कटु मुद्दय़ांचीच उजळणी केली. या कटुतेचा परिणाम भारताच्या निवेदनातूनही दिसून आला. ‘‘दोन्ही देशांचा संवादावर भर असून एकमेकांच्या संपर्कात राहाण्यावर एकमत झाले आहे,’’ असे निवेदन परराष्ट्र खात्याने जारी केले असले तरी पुढील बैठक नेमकी कधी होईल, याचे कोणतेही सुतोवाच नाही.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव ऐझाझ अहमद चौधरी मंगळवारी नवी दिल्लीत ‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेच्या निमित्ताने उपस्थित होते. त्यांनी भारतीय परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. भारताच्या वतीने पठाणकोट हल्ला आणि त्याच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाची संभाव्य पाकिस्तान भेट हे मुद्दे महत्त्वाचे होते. तसेच नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अपहृत केल्याचा आरोपही भारताने या बैठकीत प्रथमच केला. पाकिस्तानने त्यावर बलूचिस्तान आणि कराची येथील रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेच्या कारवाया वाढत असल्याचा आरोप केला. तसेच काश्मीर प्रश्न हाच दोन्ही देशांतील कळीचा मुद्दा असल्याची भूमिका कायम ठेवली.

काश्मीर प्रश्न दोन्ही देशांनी कोणाच्याही मध्यस्थीशिवाय सोडवावा अशी भारताची भूमिका असतानाही पाकिस्तानने तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे ठराव आणि काश्मिरी जनतेच्या आकाक्षांनुसार सोडवावा अशी आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे.

पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या आकांक्षेनुसार परराष्ट्र सचिवांनी भारतासह अन्य देशांशी शांततामय संबंध स्थापित करण्यासाठी आपली वचनबद्धता प्रकट केली. जम्मू-काश्मीरसह सर्व द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा झाली.

चौधरी यांच्यापूर्वी जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे उप-परराष्ट्रमंत्री हिकमत करझाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.