श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि अफजल गुरुला फाशी दिल्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानातील संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारने भारत आणि पाकिस्तानमधील हॉकी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पुढील महिन्यात दोन्ही देशांदरम्यान भारतात ही स्पर्धा होणार होती. त्यानंतर मेमध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱयावर जाणार होता. मात्र, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हॉकी इंडियाला पत्र पाठवून दोन्ही देशांमधील स्पर्धा रद्द करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अफजल गुरुला फाशी दिल्याच्या निषेध करणारा प्रस्ताव पाकिस्तानी संसदेने मंजूर केल्याचा विषय विरोधकांनी शुक्रवारी संसदेमध्ये उपस्थित केला. लोकसभेमध्ये यशवंत सिन्हा आणि राज्यसभेमध्ये प्रकाश जावडेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून याच विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी यशवंत सिन्हा यांची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाची कार्यवाही १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. सरकारने पाकिस्तानबरोबरची चर्चा तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपने केली आहे.