भारताचे परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी त्यांच्या सार्क यात्रेत भूतान व बांगला देशला भेट दिल्यानंतर आज पाकिस्तानात त्यांचे समपदस्थ एझाझ चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली. ढाका येथून त्यांचे सकाळी येथे आगमन झाले. त्यांचे पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त टी.सी.ए.राघवन यांनी स्वागत केले.
  गेल्या वर्षी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा काश्मिरी विभाजनवाद्यांनी दिल्लीत पाकिस्तानच्या उच्चायुक्तांची भेट घेतल्याने ऐन वेळी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रथमच परराष्ट्र सचिव पातळीवर भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र प्रवक्तया तनसीम अस्लम यांनी आजची चर्चा कोंडी फोडणारी होती असे सांगितले.
   जयशंकर यांनी सांगितले की, चर्चा रचनात्मक व सकारात्मक वातावरणात झाली, त्यात मुंबईतील दहशतवादी हल्ला व सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद हे मुद्देही आपण मांडले. दोन्ही देश एकेक पाऊल पुढे सरकल्याचे या चर्चेमुळे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांच्याशीही जयशंकर यांनी चर्चा केली.
परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी चौधरी यांची परराष्ट्र कार्यालयात भेट घेतली. जयशंकर यांनी सांगितले, की पाकिस्तान भेटीबाबत आपण आनंदी आहोत व पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी उपयोगी चर्चा होईल अशी आशा आहे.
पाकिस्तानने द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याबाबत या अगोदरच  सकारात्मक भूमिका घेतली असून भारतानेही दोन्ही देशातील संबंध सुरळित करण्यासाठी परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा सुरू करून एक पाऊल पुढे टाकले आहे.
जयशंकर यांनी त्यांची सार्क यात्रा भूतानमधून सुरू केली व सोमवारी बांगलादेशला भेट दिली. आता ते बुधवारी अफगाणिस्तानला जात असून त्यापूर्वी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करणार आहेत.