News Flash

जैशच्या पाकिस्तानी कमांडरसह दोन ठार

जैशच्या पाकिस्तानी कमांडरसह दोन ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत शनिवारी जैश ए महंमदचा कमांडर असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यासह एकूण दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मारल्या गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव मीर झीनत उल इस्लाम असून तो हिज्बुल मुजाहिद्दीनचा होता, त्याच्याविरोधात दहशतवादाचे अनेक गुन्हे होते.इरफान हमीद या नागरिकाच्या हत्येत तो सामील होता.

जैशचा कमांडर मुन्ना लाहोरी हा पाकिस्तानचा असून तो यात मारला गेला. काश्मीरमध्ये अनेक हत्यांमध्ये त्याचा हात होता. दुसरा दहशतवादी हा लाहोरीचा साथीदार होता, तोही यात मारला गेला असून तो स्थानिक होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. लाहोरी हा बिहारी या नावानेही ओळखला जात होता.

पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने लाहोरी याला तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती करण्यासाठी नेमले होते. लाहोरी हा स्फोटके तयार करण्यात निपुण होता.

शोपियाँ जिल्ह्य़ात बोनबझार भागातील बांदे मोहल्ल्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दले तेथे गेली असता  त्या वेळी चकमक झाली, त्यात हे दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडे आक्षेपार्ह साहित्य व दारूगोळा सापडला आहे.

लाहोरी हा ३० मार्च रोजी बनिहाल येथे सुरक्षा दलांच्या वाहन काफि ल्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात  सामील होता. १७ जून रोजी पुलवामातील अरिहाल येथे लष्कराच्या वाहनावर जो कारबॉम्ब हल्ला झाला त्यातही त्याचा हात होता. त्या हल्ल्यात दोन जवान मारले गेले तर दोन नागरिक जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 11:19 pm

Web Title: india pakistan kashmir conflict mpg 94
Next Stories
1 आकाशगंगेतील २८ नवीन ताऱ्यांचा शोध
2 ममतांच्या तुष्टीकरणाच्या धोरणांचा विपरीत परिणाम
3 जगातील बलाढ्य आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात
Just Now!
X