येत्या १९ मार्चला धर्मशाला येथे होणारा भारत पाकिस्तानमधील ट्वेंटी-२० सामन्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने या सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे ऐनवेळी हा सामना कुठे घ्यायचा असा पेच बीसीसीआयपुढे उभा राहिला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र पाठवून या सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली.
दरम्यान, वीरभद्र सिंह यांनी ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. हा सामना धर्मशाला येथे होणार हे खूप दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आले होते. त्यावेळीच वीरभद्र सिंह यांनी त्यावर आक्षेप का नाही घेतला, असा प्रश्न अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. सुमारे वर्षभरापूर्वीच ट्वेंटी-२० विश्वकरंडक सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी त्याप्रमाणे आगाऊ तिकीटही निश्चित केले आहे. असे असताना आता ऐनवेळी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
‘बीसीसीआय’ने हा सामना रद्द करावा किंवा त्याचे ठिकाण बदलावे, अशी मागणी करणारे पत्र वीरभद्र सिंह यांनी सोमवारीच बीसीसीआयकडे दिले आहे. आता बीसीसीआय काय भूमिका घेते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.