|| शुभजित रॉय,

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चार महिन्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोभाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसुफ यांची पुढील आठवड्यात दुशान्बे येथे भेट होणार आहे.

ताजिकिस्तानच्या राजधानीत होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत दोभाल आणि युसुफ सहभागी होणार आहेत. दोभाल हे २३-२४ जून रोजी बैठकीला स्वत: हजर राहणार आहेत. या बैठकीला अफगाणिस्तानचे एनएसए हमदुल्लाह मोहीब, रशियाचे एनएसए निकोलाय पॅट्शेव्ह आणि चीन, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे एनएसएही हजर राहणार आहेत.

अफगाणिस्तानमधील अस्थिर स्थिती आणि भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या चार महिन्यांपासून असलेली शांतता या पाश्र्वाभूमीवर दोभाल यांचा बैठकीतील सहभाग आणि द्विपक्षीय बैठक महत्त्वाची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, युसुफ यांच्यासमवेतची भेट अद्याप ठरलेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एससीओची शेवटची बैठक वादळी ठरली होती, जम्मू-काश्मीरला नकाशामध्ये पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आले होते आणि त्याच्या निषेधार्थ दोभाल बैठकीतून निघून गेले होते. भारताने या बेकायदेशीर नकाशाला तीव्र हरकत घेतली होती आणि रशियानेही या नकाशाचा वापर न करण्याबाबत पाकिस्तानचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांततापूर्ण संबंध असावे, असे अलीकडेच पाकिस्तानच्या लष्करानेही सूचित केले होते आणि आता दोन्ही देशांमधील संबंध चांगले व्हावेत यासाठी दोन्ही देशांचे एनएसए  काही महिन्यांपासून  संपर्कात आहेत.

शेजाऱ्यांसह ‘शांततापूर्ण सहअस्तित्व’ हवे : तालिबान

अमेरिकी आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून माघारी घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ११ सप्टेंबरची मुदत निश्चित केली असताना, तसेच अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत भारताचे तालिबानला अनुकूल धोरण शंका व अनिश्चिततेभोवती फिरत असताना आपल्याला शेजाऱ्यांसोबत आणि या भागात ‘शांततापूर्ण सहअस्तित्व’ हवे असल्याचे तालिबानने शनिवारी सांगितले.