भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून फुटीरतावाद्यांच्या मुद्द्यावरून घेण्यात आलेल्या कठोर पवित्र्यामुळे दिल्लीत होऊ घातलेल्या द्विपक्षीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील चर्चेचे भवितव्य टांगणीला लागले आहे. पाकिस्तान हुरियत नेत्यांना चर्चेत सहभागी करावे, या अटीवर अडून बसल्यामुळे हा सगळा तणाव निर्माण झाला आहे. या अटी स्विकारणे शक्य नसल्याचे सांगत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही चर्चा रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आज दुपारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनीदेखील पाकिस्तानमध्ये अशाचप्रकारच्या पत्रकारपरिषदेचे आयोजन केले आहे. त्यामुळे या दोन्ही पत्रकारपरिषदांमध्ये काय होणार, यावर उद्याच्या संपूर्ण चर्चेचे भवितव्य अवलंबून असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
पंजाबच्या उधमपूरमध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर करण्यात आलेला हल्ला त्याचप्रमाणे पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणार शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील चर्चा दिल्लीत २३ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी निश्चित झाले होते. त्यानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिझ भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांची भेट घेतील.