सीमा रेषेवरील तणावपूर्ण वातावरणात एकमेकांसमोर उभे ठाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला. शांघाय सहकार्य संघटनेतील देशांनी शुक्रवारी संयुक्त लष्करी सराव केला असून यात भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. रशियात हा संयुक्त सराव करण्यात आला.

शांघाय सहकार्य संघटनेतील चीन, रशिया व अन्य देशांचे सैन्य ‘शांतता मिशन २०१८’ अंतर्गत संयुक्त सराव करत आहेत. दहशतवादाविरोधात या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. रशियात शुक्रवारपासून या लष्करी सरावाला सुरुवात झाली.

शहरी भागात दहशतवादी कारवायांविरोधात कशी मोहीम राबवावी, याचे प्रशिक्षण यात दिले जाणार असून या सरावात मॉक ड्रील देखील घेतली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.

संयुक्त लष्करी सरावात रशियाचे सुमारे १,७०० सैनिक, चीनचे ७०० आणि भारतीय लष्कराचे २०० जवान सहभागी झाले आहेत. यात राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.

शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना २००१ मध्ये करण्यात आली असून चीन, कझाकस्तान, रशिया, किर्गीझस्तान, ताजिकिस्तान हे एससीओचे संस्थापक देश आहेत. सध्या एससीओमध्ये आठ स्थायी सदस्य आहेत. यात भारत, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. दहशतवाद, फुटिरतावादाविरोधात लढा देण्यासाठी आणि शांतता निर्माण करण्यासाठी एससीओची स्थापना करण्यात आली.