संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ‘काश्मीरमधील नागरिकांना स्वयंनिर्णयाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचे पाहून आपल्याला वाईट वाटते. परकीय देशाच्या अमलाखाली घेतलेल्या निवडणुकांमधून येथील जनतेच्या भावनांचे खरेखुरे प्रतिबिंब उमटत नाही’, अशी मल्लिनाथी पाकिस्तानी प्रतिनिधींनी केली. तर पाकिस्तानी प्रतिनिधींचा हा दावा आगंतुक असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, अशा शब्दांत भारताने त्याचा प्रतिवाद केला आहे. मात्र प्रत्युत्तराचा अधिकार वापरताना ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा भारताकडून केला जाणारा दावा निखालस खोटा असून हा केवळ वादग्रस्त प्रदेश आहे’, असे पाकिस्तानी शिष्टमंडळाने म्हटले आहे.
सामाजिक, मानव्य आणि सांस्कृतिक विषयांशी संबंधित संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या समितीच्या बैठकीचा वृत्तांत संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सोमवारी या बैठकीत ‘वंशद्वेष, वर्णभेद, परराष्ट्रांबद्दल वाटणारा तिरस्कार आणि स्वयंनिर्णयाचा अधिकार’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधी म्हणून दियार खान सहभागी झाले होते. त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
जम्मू-काश्मीरमधील जनतेला स्वयंनिर्णयाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला. तसेच यामुळे ‘पाकिस्तानचे अंत:करण व्यथित’ होत असल्याचाही दावा केला. स्वयंनिर्णयाचा हक्क बजावण्यासाठी मुक्त वातावरणाची गरज असते, असे ते म्हणाले. भारताचा अविभाज्य भाग असेलेल्या काश्मीरविषयी बोलताना, ‘परकीय देशाच्या अमलाखाली असताना घेण्यात आलेल्या निवडणुकांमधून तेथील जनतेच्या खऱ्या भावना व्यक्त होत नाहीत’, असे विषारी फूत्कारही खान यांनी या परिषदेत सोडले.

भारताची चपराक
भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधी मयांक जोशी यांनी दियार खान यांचा दावा फेटाळला. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका येथे खुल्या वातावरणात पार पडतात, असे जोशी म्हणाले.  सर्व भेदभावांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सदैव कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

पाकचा विखार
परिसंवादातील प्रत्युत्तराचा अधिकार वापरताना पाकचे प्रतिनिधी दियार खान यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भागच नसल्याचे म्हटले आहे. भारतीय प्रतिनिधींकडून करण्यात येणारा हा दावा निखालस खोटा असून ‘हा प्रदेश वादग्रस्त म्हणून घोषित झाला आहे,’ असा विखारी प्रचार खान यांनी केला.

वाद-प्रतिवाद
भारतीय यंत्रणेने घेतलेल्या  निवडणुका या संयुक्त राष्ट्रांच्या सुचविलेल्या सार्वमताच्या प्रस्तावास पर्याय ठरू शकणार नाही, असे खान म्हणाले. त्यावर या निवडणुका आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या समक्ष पार पडल्या आहेत आणि त्यापैकी कोणीही गैरप्रकार झाल्याचे म्हटले नाही, असे उत्तर जोशी यांनी दिले.