आज सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली. मागील तीन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढतच चालले आहेत. आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८ रुपये ६७ पैसे इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर ७७ रुपये ८२ पैसे इतका झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ८१ रुपये २८ पैसे प्रति लिटर तर डिझेल ७३ रुपये ३० पैसे प्रति लिटरला मिळत आहे. एकंदरीतच इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याची झलक सोशल मिडियावरही पहायला मिळत आहे. सध्या भूतान आणि भारतामधील इंधन दरामध्ये असणाऱ्या फरकासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलुत्पल दास यांनी पाच दिवसांपूर्वी शेअर केलेली पोस्ट साडेतीन हजारहून अधिक लोकांनी शेअर केली आहे. मुळचे गुवहाटीच्या असणाऱ्या दास यांनी पेट्रोल पंपाचे दोन फोटो काढून त्याबरोबर शेअर केलेला मजकूर भारतातील इंधनाच्या दरांसंदर्भात खरोखरच विचार करायला लावणारा आहे. या पोस्टमध्ये दास यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शेअर केलेला फोटो हा भूतानमधील पेट्रोल पंपाचा असून ते ९ सप्टेंबर रोजी भूतानला गेले होते तेव्हा त्यांनी तो फोटो काढला आहे. या पोस्टमध्ये दास म्हणतात, ‘लूट-मार… आज मी भूतानमधील सॅमड्रूप जोंगखा येथे गेलो होतो. आणि तिथे मला काय सापडलं ठाऊक आहे?, भूतानमध्ये इंडियन ऑईल कंपनीचे एक लिटर पेट्रोल ६० रुपये ०४ पैशांना मिळते. याच एक लिटर पेट्रोलची गुवहाटीमध्ये ९ सप्टेंबर २०१८ रोजी किंमत होती ८२ रुपये ९७ पैसे. बरं सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे भूतानमध्ये भारतामधून पेट्रोल आयात केले जाते. असे असूनही इथे भारतात आपल्याला एक लिटर इंधनासाठी भूतानमधील दरांपेक्षा २२ रुपये ९३ पैसे अधिक मोजावे लागतात.’

निलुत्पल यांच्या या पोस्टखाली कमेन्ट सेक्शनमध्ये सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. काहींनी भारतामधील दर हे इतर अनेक देशांपेक्षा कमीच असल्याचे म्हटले आहे तर काहींनी सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या कराचा हिस्सा खूपच अधिक असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सोमावरी पुकारण्यात आलेल्या भारत बंद नंतरही दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी इंधनाचे दर चढेच राहिलेले दिसले. अखेर सलग १७ दिवस वाढ झाल्यावर बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नाहीत. त्यानंतर गुरुवारी पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी महागले. आता आज पुन्हा एकदा पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी महागले आहे.

इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेससह सगळ्याच विरोधकांनी भारत बंद पुकारला होता. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत अशीही मागणी केली होती. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला महागाईच्या अंधारात ढकलले आहे अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी काल केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pay rupees 22 93 more per liter of fuel compared to bhutan
First published on: 14-09-2018 at 15:33 IST