भारताच्या चांद्रयान १ मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान – २ या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा देखील सहभागी होत आहे. नासाची चंद्राचे परीक्षण करणारी दोन लेझर उपकरणं भारतीय चांद्रयान व इस्त्रायली बेरेशीट यांच्या माध्यमातून चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या उपकरणांना लेझर रिफ्लेक्टर्स असे म्हटले जाते.

याबाबत टेक्सस येथे झालेल्या संमेलनात नासाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. भारताचे चांद्रयान २ व इस्त्रायली बेरेशीट एप्रिल ११ रोजी चंद्रावर दाखल होणार आहेत. चांद्रयान नासाच्या उपकरणाला चंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे. नासा व इस्त्रो यांच्या या संयुक्त मोहिमेमुळे पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर अत्यंत अचूकपणे मोजण्यास मदत मिळणार आहे.

भारतीय चांद्रयानाच्या मदतीने चंद्रावर जाणारे हे उपकरण विशिष्ट प्रकारची किरणे पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित करणार आहे. ही किरणे पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित केल्यानंतर संबंधित वेळेची नोंद केली जाणार आहे. या किरणांना जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागतो याचे मोजमापन करण्यात येणार आहे. या किरणांचे अवलोकन करण्यासाठी पृथ्वीवर एक विशिष्ट उपकरण बसवण्यास आले आहे. या प्रयोगामुळे पृथ्वीच्या दिशेने आलेल्या या किरणाना किती वेळ लागतो हे कळेल. आणि या वेळेनुसार पृथ्वी व चंद्र यामधले अचूक अंतर शोधता येईल असा दावा नासाच्या संशोधकांनी केला आहे. यापूर्वीही चंद्राचे अचूक अंतर शोधण्याचा प्रयत्न नासाकडून करण्यात आला होता.