दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून जगात कोणता देश असेल तर तो पाकिस्तान आहे. मागील ७० वर्षांमध्ये भारताने विकास साधला. मात्र पाकिस्तानने दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केले असे म्हणत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेतील मंचावरून खडे बोल सुनावले.

निष्पाप लोकांचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानने भारताला माणुसकीचे धडे शिकवण्याची गरज नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे जेव्हा भारताच्या विरोधात गळा काढत होते तेव्हा इथे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हाच प्रश्न होता की, ‘हे कोण बोलते आहे बघा?’ पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दहशतवादी तयार करण्यासाठी जे पैसे खर्च केले ते जर देशाच्या विकासासाठी खर्च केले असते तर त्यांची प्रगती तरी झाली असती.

भारताने वैज्ञानिक, डॉक्टर, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ घडवले, पाकिस्तानने काय घडवले तर फक्त दहशतवादी आणि दहशतवादी संघटना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता बाळगण्याची आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची नियत दाखवली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले हे सर्वांना ठाऊक आहेच  असेही सुषमा स्वराज यांनी म्हणत पाकिस्तानला फटकारले आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सुमारे २० ते २२ मिनिटे भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उत्तर देताना  भारताने कधीही विकासाची कास सोडली नाही. भारत सध्याच्या घडीला गरीबीशी लढतोय. गरीबीचे समूळ उच्चाटन हे आमचे लक्ष्य आहे तर पाकिस्तानला आमच्याशी भांडण करणे सुचते आहे. हिंसाचाराच्या घटना जगभरात वाढत चालल्या आहेत. दहशतवादी विचारधारांची पाळेमुळेही चांगलीच रूजली आहेत. या सगळ्याला कोणी जबाबदार असेल तर तो पाकिस्तान हा देश आहे कारण त्यांनी कायमच दहशतवादाची पाठराखण केली आहे.

द्विपक्षीय संबंधांवर दोन्ही देशांमध्ये काय करार झाले, काय बोलणे झाले हे पाकिस्तानला लक्षात आहे मात्र त्यांचे नेते सोयीस्करपणे सगळे विसरण्याचे नाटक करत आहेत. ‘दहशतवादी देश’ ही आपली ओळख का निर्माण झाली याचे आत्मपरीक्षण पाकिस्तानने कधी केले आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

भारताने कशा प्रकारे विकास केला आहे, जनधन योजना कशी यशस्वी ठरली. नोटाबंदीचा निर्णय कसा योग्य आहे. जीएसटीमुळे काय काय बदल घडू शकतात या सगळ्या मुद्यांचाही उल्लेख सुषमा स्वराज यांनी भाषणात केला. भारत आजच्या घडीला क्रांतीकारी बदलांच्या उंबरठ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण या सगळ्यामागे आहे असेही त्यांनी म्हटले.