रशिया पाठोपाठ भारताने इस्त्रायल बरोबर एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा खरेदी करार केला आहे. इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही सरकारी कंपनी ७७७ मिलियन डॉलरचे हे अतिरिक्त कंत्राट मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. भारतीय नौदलाच्या सात जहाजांवर इस्त्रायल एअरोस्पेसची एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा तैनात केली जाईल.

केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली. एलआरएसएएम सिस्टिम बराक ८ कुटुंबाचा भाग असून इस्त्रायली नौदलबरोबरच भारताचे नौदल, हवाई दल आणि भूदल या सिस्टिमचा वापर करते. या नव्या करारामुळे बराक आठ क्षेपणास्त्राच्या विक्रीचा व्यवहार ६ अब्ज डॉलरपेक्षा पुढे गेला आहे असे आयएआयकडून सांगण्यात आले.

आयएआयची गेल्या अनेक वर्षांपासून भारताबरोबर भागीदारी आहे. भारत आमच्यासाठी मोठी बाजारपेठ असून वाढती स्पर्धा लक्षात घेता आम्ही आमचे स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करु असे आयएआयकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि इस्त्रायलचे अत्यंत दृढ संबंध असून संरक्षणाबरोबरच शेती आणि अन्य तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच इस्त्रायलने भारताला सहकार्य केले आहे.

अमेरिका आणि रशियाच्याबरोबरीने इस्त्रायलनेही भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे. बराक ८ ही जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. भारताने अलीकडेच रशिया बरोबर एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमचा खरेदी करार केला आहे.