राजधानी दिल्लीत सहा जणांच्या निर्घृण बलात्काराची बळी ठरलेल्या पीडित तरुणीचा सिंगापूर येथे शनिवारी पहाटे मृत्यू झाला. तिचा गेले तेरा दिवस जीवन-मरणाचा झगडा चालू होता. तिच्या मृत्यूची बातमी शनिवारी सकाळी समजताच देशभर संतापाची लाट उसळली. लोकांमधून तसेच विविध संघटनांकडून प्रक्षोभ व्यक्त करण्यात आला. बलात्काराच्या प्रश्नावर देशाकडे उत्तरच नाही का, अशी हताशपणाची भावनाही समाजातून उमटली. राष्ट्रपतींपासून जनसामान्यांपर्यंत अनेकांनी आपला उद्वेग व्यक्त केला. त्यातून देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
तरुणीचा मृतदेह रविवारी पहाटे दिल्लीत आणण्यात येणार आहे. सिंगापूर येथील प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता (भारतीय प्रमाणवेळ रात्री दहा) एअर इंडियाचे विशेष चार्टर्ड विमान तरुणीचा मृतदेह घेऊन निघाले.  
सिंगापूर येथील एलिझाबेथ हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केलविन लोह यांनी सांगितले की, या निधनाची बातमी देताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. पहाटे सव्वादोन वाजता पीडित तरुणीचा मृत्यू झाला. तिचे कुटुंबीय व भारतीय दूतावासाचे अधिकारी अंत्यसमयी रुग्णालयात होते. रुग्णालयाचे डॉक्टर व परिचारिका यांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर तिला गुरुवारी सकाळी सिंगापूर येथे हलवण्यात आले होते, सुरुवातीला तिने उपचारांना प्रतिसाद दिला होता, पण नंतर तिची प्रकृती आणखी ढासळत गेली.
या मुलीवर १६ डिसेंबर रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार करून तसेच तिला बेदम मारहाण करून तिला तिच्या सहकाऱ्यासह फेकून दिले होते. सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन यांनी सांगितले, ‘‘या मुलीच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्या अंत्यसंस्काराबाबत काही ठरवलेले नाही. तिच्या निधनाने ते उद्ध्वस्त झाले आहेत. तिच्यावर करण्यात आलेल्या उपचारांबाबत ते समाधानी आहेत. तिचे शेवटचे काही तास ही कुटुंबीयांसाठी अग्निपरीक्षा होती. त्यांनी अतिशय धैर्याने या परिस्थितीस तोंड दिले. पंतप्रधानांनी पाठवलेला शोकसंदेश आम्ही तिच्या कुटुंबीयांना दिला आहे. ‘भारत हा स्त्रियांसाठी एक सुरक्षित देश राहील असे वातावरण तयार करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. एलिझाबेथ रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर लोह यांनी सांगितले की, भारतीय वेळेनुसार काल सायंकाळी साडेसहा वाजता तरुणीची प्रकृती आणखी नाजूक बनली होती, तिचे बहुतांश अवयव काम करेनासे झाले होते. तिला कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले होते.     

जखमांमुळे मृत्यू
दिल्लीहून सिंगापूरला नेतानाच या तरुणीचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली गेली होती का, या प्रश्नावर राघवन यांनी सांगितले की, अशा कुठल्याही शंका उपस्थित केल्या गेल्या नव्हत्या. तिला दिल्ली व सिंगापूर येथे सर्वोत्तम उपचार देण्यात आले आहेत. तिचा मृत्यू हा तिला झालेल्या जखमांमुळे झाला आहे. या जखमा खोलवर झालेल्या होत्या.  

बळकट समाजनिर्मितीसाठी बलिदान कामी येईल
पीडित मुलगी अखेरच्या क्षणापर्यंत धैर्याने लढली. भारतीय नारीचे प्रतीक म्हणून तिचे नाव कायम राहील. उद्याच्या बळकट समाजनिर्मितीसाठी तिचे बलिदान कामी येईल.
प्रणब मुखर्जी, राष्ट्रपती

झुंज व्यर्थ ठरणार नाही
तरुणीसाठी रस्त्यांवर उतरलेल्या लोकांचा रोष आणि संताप ऐकला गेला आहे. देशाच्या लाडक्या मुलीने मृत्यूशी दिलेली झुंज व्यर्थ ठरणार नाही. आरोपींना सर्वात कठोर शिक्षा होऊन तिला न्याय मिळेल.
सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा