विविध उपायोजना करुनही रेल्वे अपघातांची संख्या कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनमध्ये ब्लॅक बॉक्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे लवकरच विमानाच्या धर्तीवर ट्रेनमध्ये ब्लॅक बॉक्सचा वापर सुरु करणार आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे ट्रेनमध्ये व्हॉईर रेकॉर्डर किंवा ब्लॅक बॉक्स बसवणार आहे.

रेल्वे दुहेरी उद्देशाने या उपकरणाचा वापर करणार आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेणे तसेच प्रवासा दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्याच्या उद्देशाने हे उपकरण बसवण्यात येणार आहे. लोको कॅब व्हॉईस रेकॉर्डिंग (एलसीव्हीआर) हे उपकरण इंजिन कक्षात बसवण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडिओ/व्हॉईस रेकॉर्डिंग सिस्टिममुळे अपघाताच्यावेळी नेमकी मानवी चूक कितपत असते ते लक्षात येईल. ब्लॅक बॉक्स हे उपकरण प्रत्येक विमानामध्ये बसवलेले असते. फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरनी मिळून ब्लॅक बॉक्स तयार होतो. विमानाचा शेपटाक़डचा जो भाग असतो तिथे हा ब्लॅक बॉक्स ठेवला जातो.

ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचे नेमके कारण समजते. भारतात मागच्या काही वर्षात झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिक आपल्या प्राणांना मुकले आहेत. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत होईल तसेच पुढच्यावेळी असा अपघात होऊ नये यासाठी उपायोजना करता येतील.