विरोधकांकडून टीकेचा भडीमार होत असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पाठीवर जागतिक बॅंकेने कौतुकाची थाप मारली आहे. देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी जाचक अटी वगळून पोषक स्थिती निर्माण करण्यात (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) मोदी सरकार यशस्वी ठरले असून, त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारताचे मानांकन सुधारले आहे. एकूण १८९ देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक १३० वर गेला आहे. जागतिक क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत १२ स्थाने वर सरकला आहे.
या संदर्भात जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू म्हणाले, जगातील एखाद्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत इतक्या अल्प कालावधीत १२ स्थानांनी सुधारणा होणे, ही अत्यंत मोठी घटना असून, कौतुकास्पद कामगिरी आहे. १४२ व्या स्थानावरून १३० व्या स्थानापर्यंत वर सरकरणे हे देशातील सरकारचा प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याचे द्योतक आहे. देश योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, हे सुद्धा यातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
‘डूईंग बिझनेस २०१६’ हा वार्षिक अहवाल जागतिक बॅंकेकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. अहवालातील क्रमवारीत सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. याचाच अर्थ व्यवसाय सुरू करण्यासाठी सिंगापूरमध्ये अत्यंत पोषक स्थिती आहे. यादीत त्यानंतर न्यूझिलंड, डेन्मार्क, दक्षिण कोरिआ, हाँगकाँग, ब्रिटन आणि अमेरिकेचा क्रमांक आहे.
यादीमध्ये चीन ८४ व्या स्थानावर असून, पाकिस्तान भारतापेक्षा खाली १३८ व्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या क्रमवारीत गेल्यावर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.