लागोपाठ चौथ्या वर्षी फिनलंड प्रथम

यंदाचा (२०२१)  जागतिक आनंद निर्देशांक अहवाल जाहीर करण्यात आला असून फिनलंडने लागोपाठ चौथ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने हा अहवाल जाहीर केला असून त्यात १४९ देशांत भारताचा १३९ वा क्रमांक लागला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत  भारताची स्थिती थोडीशी सुधारली आहे. गेल्या वर्षी भारताचा १४० वा क्रमांक होता. पहिल्या दहा देशात नऊ युरोपातील आहेत.

फिनलंड खालोखाल डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलँड, नेदरलँडस, नॉर्वे, स्वीडन, लक्झेमबर्ग व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. एकूण देशांतर्गत उत्पन्न, सामाजिक पाठबळ, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार पातळी या निकषांवर सुखी देशांची ही यादी ठरवली जात असते. यावर्षी  कोविड १९ आव्हानाच्या काळात हा अहवाल कसा तयार करायचा हे आव्हान होते कारण जगातील सर्वच देशांना या विषाणूने जेरीस आणले आहे. अहवालाच्या लेखकांपैकी एक असलेले जेफ्री सॅख यांनी म्हटले आहे, की करोनाच्या साथीने आपल्याला जागतिक पर्यावरणाच्या धोक्यांची जाणीव करून दिली. दी वल्र्ड हॅपिनेस रिपोर्ट २०२१ या अहवालात आपल्याला केवळ  संपत्तीपेक्षा लोकांच्या सुखसमाधानाचा वेध घेतलेला दिसेल. शाश्वत विकासाची आव्हाने आपण स्वीकारली नाहीत तर आपल्याला वाईट अवस्थेस तोंड द्यावे लागू शकते असाच एक संदेश यातून दिला आहे.

करोनाची साथ जगात थैमान घालत असताना यावर्षीच्या अहवालात दोन वेगळ्या वर्गवाऱ्या दिसतात, त्यात तीन वर्षातील पाहणीची सरासरी हा एक घटक विचारात घेतला आहे. दुसरा घटक हा कोविडमुळे लोकांच्या जीवनावर काय परिणाम झाला हा आहे.

विश्वास हे मोजमाप

या अहवालाच्या लेखकांनी म्हटले आहे, की विश्वास हा कुठल्याही देशाच्या आनंद निर्देशांकात महत्त्वाचे मोजमाप असते. ज्या देशात नागरिकांची तेथील संस्थांवर श्रद्धा व विश्वास होता व ज्या देशात उत्पन्न समानता जास्त होती त्या देशांनी करोना साथीला चांगल्या पद्धतीने तोंड दिले.

ठळक वैशिष्ट्ये  

अफगाणिस्तान शेवटच्या क्रमांकावर राहिला असून अमेरिका एक स्थान घसरून १९ वा आला आहे.

आशियायी देशांनी गेल्यावर्षीपेक्षा चांगली कामगिरी केली.

चीनचा क्रमांक ९४ वरून ८४ वर आला आहे.