कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत भारतामधील परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे म्हटलं आहे. मात्र आता भारताने यावर आक्षेप घेतला असून या वक्तव्याचा निषेध केला आहे. कॅनडामधील लोकप्रतिनिधींना या संदर्भात पुरेशी माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही असंही भारताने म्हटल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

मंगळवारी सलग सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे. प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांचा या कृषी कायद्यांना विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर आता थेट परदेशातून या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

नक्की वाचा >> शेतकरी आंदोलनाला कॅनडाच्या पंतप्रधानांचा पाठिंबा; म्हणाले, “भारतातील परिस्थिती काळजी करण्यासारखी असून…”

भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे म्हटले आहे.

त्रुडो नक्की म्हणाले?

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या मंत्रीमंडळामधील शीख नेत्यांशी संवाद साधताना त्रुडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. “भारतामधील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करणं चुकीचं ठरेल. भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या या आंदोलनाची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. तिथे असणाऱ्या शीख समुदायातील व्यक्तींच्या नातेवाईकांबद्दल कॅनडात राहणाऱ्या अनेकांना चिंता वाटत असेल आणि ते सहाजिक आहे. मात्र मी तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याच्या हक्काचे आम्ही पाठीराखे आहोत. संवादातून प्रश्न सुटू शकतो यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या विषयाबद्दलची आमची चिंता आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी व्यक्त केली आहे. करोना आणि सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे,” असं  त्रुडो यांनी म्हटलं आहे.