भारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नीने त्यांच्या एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने त्यांना परत दिल्लीत नेमणूक देण्यात आली आहे, त्याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी आपण मायदेशी परत चाललो आहोत असे थापर यांनी सांगितले व आरोपांचा इन्कार केला. आपली पत्नी ५० वर्षांची असून ती मोटार अपघातात जखमी झालेली आहे, तिच्या मानेला पट्टा आहे असे असताना ती कुणाचा छळ करू शकेल असे वाटत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यूझीलंडमध्ये गेल्या महिन्यात मंत्रालयाचे खास पथक गेले होते. त्यांनी या आरोपाची चौकशी करून अहवाल सादर केला. त्या आधारे भारताने हा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यास मारहाण केली तो खानसामा असून त्याला एकदा वेलिंग्टन येथील राजनैतिक निवासापासून रात्री २० कि.मी. चालत जावे लागले.  त्याने केलेल्या आरोपानुसार न्यूझीलंडमधील उच्चायुक्त थापर यांच्या पत्नी शर्मिला यांनी त्याला गुलामासारखे वागवून हल्ला केला.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले, की १० मे ला ही बाब मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली संबंधित कर्मचाऱ्याने कुठलेही आरोप आधी केले नसतानाही चौकशी करण्यात आली व उच्चायुक्तांना मुख्यालयात परत आणण्यात आले.  त्यावर न्यूझीलंडच्या पोलिसांनी ११ मे रोजी ती व्यक्ती पोलिसात हजर झाली व आरोप केल्याचे सांगितले.