केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून स्पष्ट

नवी दिल्ली: देशात करोनाशी संबंधित असलेल्या म्युकर मायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीचे आतापर्यंत ५४२४ रुग्ण १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात सापडले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले, की ५४२४ रुग्णांपैकी ४५५६ जणांना कोविड झालेला होता, तर पंचावन्न टक्के रुग्ण हे करोना आणि मधुमेहामुळे म्युकरमायकोसिस झालेले आहेत. हर्षवर्धन यांनी कोविड मंत्रिगटाची २७ वी बैठक घेतली, त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. कोविड, मधुमेह, मूत्रपिंडाचे रोग, यकृत व हृदयाचे रोग असलेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे त्यांना म्युकर मायकोसिस हा काळ्या बुरशीचा रोगा होतो. जर अशा रुग्णांना स्टेरॉइडस देण्यात आले तर हा रोग बळावतो. म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढत असून त्यावर अ‍ॅम्फोटेरिसिन बी हे औषध महत्त्वाचे ठरणार आहे. त्याची उपलब्धता वाढवण्यात येत आहे.

मंत्रालय आणखी पाच उत्पादकांशी चर्चा करीत आहे. कोविड रुग्णांना डेक्सामेथॅसॉन सारखी प्रतिकारशक्ती प्रणालीचा प्रतिसाद दाबून टाकणारी औषधे दिली जातात. त्यामुळे म्युकर मायकोसिससारख्या जंतूंविरोधातील लढाई आपल्या पेशी हरतात. राजस्थान, बिहार, गुजरात, पंजाब, हरयाणा, कर्नाटक, ओडिशा, तेलंगण, तमिळनाडू या राज्यात हा साथरोग जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस झाल्यास त्याची माहिती राज्य सरकारला कळवणे आवश्यक आहे.

दिल्लीत ५०० रुग्ण; औषधांचा तुटवडा

दिल्लीत म्युकोरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीचे ५०० रुग्ण असून औषधांचा मात्र तुटवडा आहे. या रोगावर अ‍ॅम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन वापरले जाते त्याची कमतरता आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, लोकनायक  रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथे या रोगावर उपचारासाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत पण औषधे मात्र उपलब्ध नाहीत. रविवारी इंजेक्शन उपलब्ध नव्हती. दर रुग्णामागे दिवसाला चार ते पाच इंजेक्शन लागत आहेत. एकूण रुग्ण ५०० असून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनची संख्या ४०० ते ५०० आहे. केंद्र सरकार राज्यांना इंजेक्शनचे वाटप करीत असून औषधाचा बाजारातच तुटवडा आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंदर जैन यांनी सांगितले की, लोक सल्ल्याशिवाय स्टेरॉइडस घेत आहेत. ते घातक असून रुग्णांची प्रतिकारशक्ती त्यामुळे कमी होत आहे.

राजस्थानात तीस जणांवर उपचार

कोटा : राजस्थानातील सरकारी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या तीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. करोनामधून वाचलेले हे लोक असल्याचे सांगून एमबीएस रुग्णालयात उपचार करणारे डॉ. राजकुमार जैन व त्यांच्या चमूने  म्हटले आहे, की कोविड नसूनही म्युकरमायकोसिस झालेला एकही रुग्ण आपल्या पाहण्यात नाही. एमबीएस रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या तीस रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील पाच ते सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील अनेक जण कोटा व राजस्थानच्या शेजारच्या जिल्ह्यातील आहेत, तर दोन मध्य प्रदेशातील आहेत. दरम्यान, करोनातून बरे झालेल्या ४५ वर्षीय रुग्णाचा म्युकरमायकोसिसने झालवाड येथून कोटा येथे आणत असताना मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसने मरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. काळी बुरशी हा रोग जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचतो तेव्हा रुग्ण दगावण्याची शक्यता शंभर टक्के जास्त असते.