संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयुक्त मिशेल बॅचलेट यांनी मानवी हक्क मंडळाच्या पहिल्याच बैठकीत भाषणात काश्मीरचा उल्लेख केल्याच्या मुद्दय़ावर भारताने खेद व्यक्त केला आहे. बॅचलेट या संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या नव्या आयुक्त असून, त्यांनी झैद राद अल हुसेन यांची जागा घेतली आहे. हुसेन यांनीही मानवी हक्क आयोगाच्या अहवालात काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला होता.

सोमवारी नव्या आयुक्त बॅचलेट यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी असे म्हटले होते, की काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला दिसत नाही. अशा गंभीर विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे तशी होत नाही असा अनुभव आहे. काश्मीरमधील लोकांना जगातील इतर लोकांप्रमाणेच न्याय व सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांच्या या हक्कांचे भारताने पालन करावे. प्रत्यक्ष सीमारेषेच्या दोन्ही बाजूंनी निरीक्षकांना भेटीची परवानगी देण्यात यावी असे त्या म्हणाल्या.

त्यांच्या या वक्तव्यावर संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजीव चंदर यांनी सांगितले, की संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क मंडळाने जे मुद्दे मांडले आहेत त्यावर भारताची मते स्पष्ट आहेत. मानवी हक्कांचे प्रश्न राष्ट्रीय सार्वभौमत्व व प्रादेशिक एकात्मता यात पारदर्शकता ठेवून सोडवायचे असतात. त्यामुळे काश्मीरबाबत बॅचलेट यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर आम्ही खेद व्यक्त करतो.

काश्मिरात सुरक्षा दलांवर गोळीबार

जम्मू : संशयित दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस पथकावर बुधवारी गोळीबार केला. यात कुठलीही प्राणहानी झाली नसून, जम्मू शहराबाहेर ही घटना झाली. पोलिसांनी महामार्गावर तपासणी नाका सुरू केला असून, एका ट्रकला थांबवण्याची सूचना केली असता तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक गुप्ता यांनी सांगितले. पोलिसांनी ट्रकला हटकले असता तो हुलकावणी देऊन गेल्यानंतर पाठलाग सुरू केला असता संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ट्रकचा चालक व वाहक यांना अटक करण्यात आली आहे. ट्रकची तपासणी केली असता त्यात एके ४७ रायफली सापडल्या असून, पाठलाग केलेल्या ट्रकमध्ये असलेले दोन ते तीन संशयित दहशतवादी पळून गेले. पोलीस, लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दले यांनी लगेच सक्रिय होऊन या परिसराला सुरक्षा कडे केले आहे. कटरा येथील चौकात सुकेतर नजीक शोधमोहीम सुरू आहे.