लडाखच्या पूर्वभागात वास्तविक नियंत्रण रेषेवरुन भारत-चीनमध्ये वाद कायम आहे. चीनने पुन्हा एकदा LAC च्या विषयावर नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही पलटवार करत अत्यंत कठोर शब्दात चीनचा LAC संबंधीचा दावा फेटाळून लावला आहे. भारतीय भूभागात अतिक्रमण करणाऱ्या चीनने १९५९ साली एकतर्फी नियंत्रण रेषा ठरवली होती. चीन त्याचा दाखला देत आहे. पण भारताने चीनचा हा एकतर्फी दावा मान्य करण्यास नकार दिला आहे.

“१९५९ साली चीनने एकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा भारताने कधीही मान्य केलेली नाही. आमची भूमिका कायम आहे. चीनसह सर्वांनाच ती माहित आहे” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

चीनचे तत्कालिन पंतप्रधान झोउ एनलाई यांनी सात नोव्हेंबर १९५९ रोजी  भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना एक पत्र पाठवले होते. त्यात प्रस्तावित केलेल्या नियंत्रण रेषेचे चीन पालन करेल असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. त्यावर भारताने चीनची १९५९ सालची LAC बद्दलची व्याख्या अजिबात मान्य करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

“LAC वर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी १९९३ साली झालेला करार, १९९६ साली दोन्ही बाजूंमध्ये विश्वास निर्माण करण्यासंबंधी झालेला करार, २००५ साली भारत-चीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी झालेला करार” या करारांचे दाखले अनुराग श्रीवास्तव यांनी दिले.