देशात करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. शुक्रवारी भारतात करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत ७७९ इतकी भर पडली. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासात आढळून आलेल्या करोना रुग्णांची संख्या जाहीर केली. त्याचबरोबर मृतांची आणि बरे होऊन घरी परलेल्या रुग्णांची आकडेवारीही जाहीर केली होती. २४ तासात देशात ५५ हजार ७९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ इतकी झाली आहे. धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील १८००० रुग्णांचा मृत्यू जुलै महिन्यात झाला आहे.

रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीलाही भारतानं मागे सोडलं आहे. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या पाच अमेरिका (१ लाख ५२ हजार ७०), ब्राझील (९१ हजार २६३), ब्रिटन (४६ हजार ८४) आणि मेक्सिको (४६ हजार) आणि पाचव्या स्थानी भारत आहे.

एका महिन्यात १० लाख रुग्ण वाढले

देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात करोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जुलै महिन्यात जवळपास १० लाख नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.