देशातील करोना संसर्ग अद्याप आटोक्यात आलेला नाही. अद्यापही दररोज नवीन करोनाबाधितांची नोंद होत आहे. याशिवाय करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांत देशभरात१३ हजार २०३ नवे करोनाबाधित आढळले असून, १३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, १३ हजार २९८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ६ लाख ६७ हजार ७३६ वर पोहचली आहे. देशात १ लाख ८४ हजार १८२ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ कोटी ३ लाख ३० हजार ८४ जणांनी करोनावर मात केली असल्याने, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय, १ लाख ५३ हजार ४७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयाने ही माहिती दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४ जानेवारीपर्यंत १९ कोटी २३ लाख ३७ हजार ११७ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ५ लाख ७० हजार २४६ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआरकडून ही माहिती मिळाली आहे.