करोना महामारीविरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईच्या दृष्टीने आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. संपूर्ण देशभरात आज प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होत आहे. देशात अद्यापही करोनाचा संसर्ग सुरूच आहे, मात्र असे जरी असले तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात १६ हजार ९७७ जणांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात १ कोटी १ लाख ७९ हजार ७१५ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ५ लाख ४२ हजार ८४१ वर पोहचली आहे.

मागील २४ तासांमध्ये देशात १५ हजार १५८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीस देशात २ लाख ११ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, आतापर्यंत १ लाख ५२ हजार ९३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारापर्यंत देशात १८,५७,६५,४९१ नमुन्यांची तपासणी केली गेली. यापैकी ८ लाख ३ हजार ९० नमून्यांची काल तपासणी झाल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली आहे.

दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात होत आहे. जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. तर, राज्यव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात होणार आहे.

… अखेर तो दिवस उजाडला! आजपासून देशभरात प्रत्यक्ष लसीकरणाची सुरूवात

करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे.