देशभरासह राज्यातील करोना संसर्ग अद्याप थांबलेला नाही. अजूनही दररोज करोनाबाधितांच्या संख्येत भर पडतच आहे व करोनामुळे मृत्यू देखील होत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील रोज वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे करोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे. तर, सध्या देशात २ लाख ४७ हजार २२० अॅक्टिव्ह केसेस असून, ९९ लाख २७ हजार ३१० जण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय करोनामुळे देशात आजपर्यंत १ लाख ४९ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २ जानेवारीपर्यंत १७,४८,९९,७८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ५८ हजार १२५ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरकडून ही माहिती मिळालेली आहे.

केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे.

आणखी एक लस

‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी तज्ज्ञांच्या समितीने ‘कोव्हॅक्सीन’ लशीच्या आपत्कालीन वापरास काही शर्तीवर मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.