भारतात मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३२९३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे.

देशात सध्याच्या घडीला २९ लाख ७८ हजार ७०९ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी ७८ लाख २७ हजार ३६७ जणांचं लसीकरण झालं आहे.