देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार ९०३ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात जवळपास २१ हजार रुग्णांची वाढ झाल्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाख २५ हजार ५४४ इतकी झाली आहे. दोन लाख २७ हजार ४३९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १८ हजार २१३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ८९२ जणांनी करोनावर मात केली आहे.

दरम्यान, आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार २ जुलै पर्यंत एकूण ९२ लाख ९७ हजार ७४९ नमूने तपासले आहेत. यापैकी गेल्या २४ तासांत देशात दोन लाख ४१ हजार ५७६ नमून्यांची चाचणी गुरुवारी करण्यात आली.

गेल्या १२ दिवसांमध्ये देशात तब्बल २ लाख करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सध्या ६० टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जगभरात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली आहे. तर जगभरात आतापर्यंत ५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.