भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या रोज नवे उच्चांक गाठत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान गेल्या २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं आहे.

भारतात गेल्या १० दिवसांत तासाला १५० मृत्यू
भारतात फक्त गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. १० दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अमेरिकेत १० दिवसांत सर्वाधिक ३४ हजार ७९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर ब्राझीलचा क्रमांक होता. ब्राझीलमध्ये ३२ हजार ६९२ मृत्यू झाले होते. पण भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकलं असून नकोसा उच्चांक नावावर झाला आहे.