करोनानं संपूर्ण देशाला आपल्या कवेत घेतलं आहे. रोजच्या रोज करोनाबाधित रुग्णांचा आकडा नकोसे विक्रम प्रस्थापित करत आहेत. बुधवारी करोना रुग्णांच्या आकड्याने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे, गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार ६१८ जणांना करोनाची लागण झाली आहे. दुसऱ्यांदा देशात करोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे.यापूर्वी ३० एप्रिलला देशात करोनाची बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी करोनावर मात केली आहे.

आतापर्यंत देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर २३ हजार १६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.

देशातील १२ राज्यात १ लाखांहून अधिक, ७ राज्यात ५० हजाराहून अधिक आणि १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी करोना रुग्ण आहेत. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाचे प्रत्येक दिवशी २.४ टक्के वेगाने रुग्ण वाढत आहेत.

लशींवरील बौद्धिक संपदा हक्क माफ होण्याचा मार्ग मोकळा; भारताच्या प्रस्तावाला अमेरिकेचा पाठिंबा

करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्याचबरोबर अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे लसीकरण वेगाने करणं गरजेचं आहे.