देशातली करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला, तरी देखील अद्याप करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित आढळले असून, ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाख ९७ हजार ६४ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ७५ लाख ९७ हजार ६४ करोनाबाधितांमध्ये ७ लाख ४८ हजार ५३८ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ६७ लाख ३३ हजार ३२९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १५ हजार १९७ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

देशात करोनाचे शिखर पार केल्याचे आणि आगामी चार महिन्यांत करोना आटोक्यात येऊ शकेल, असे निरीक्षण केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने नेमलेल्या दहा सदस्यांच्या समितीने गणिती प्रारूपाच्या आधारे नोंदवले आहे. या समितीने आकडय़ांच्या स्वरूपात त्याची माहिती दिलेली नव्हती. मात्र, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याच समितीच्या अहवालाचा आधार घेत करोना रुग्णांच्या संख्येचा अंदाज मांडला. दैनंदिन सुमारे ९० हजार रुग्णवाढ आता ५५ हजारांवर आली असून रुग्णवाढीचा वेग कमी होऊ लागला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हा वेग पुन्हा वाढणार नाही याची सरकार दक्षता घेईल, असेही हर्षवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले.