देशात दिवसागणिक करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज २० हजारांपेक्षा जास्त जणांना ससंर्ग होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. मात्र यामध्ये एक दिलासादायक बातमीही आहे. भारतामधील करोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात जवळपास सात लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी चार लाख २४ हजार ४३३ जणांनी करोनावर मात केली आहे.

लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशात करोना बाधितांच्या संख्येत दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं असून, सोमवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे २४ हजार २४८ रुग्ण आढळले असून, देशभरातील रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताने तिसऱ्या स्थानी असलेल्या रशियाला मागे टाकले आहे.

देशात गेल्या २४ तासांमध्ये ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १९ हजार ६९३ झाली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या आता ४ लाखांपेक्षा जास्त आहे. गेल्या २४ तासांमध्ये १४ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. देशभरात २ लाख ५३ हजार २८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे.

रशियाला मागे टाकत भारत जगात तिसऱ्या स्थानावर
Covid19india.org या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.