जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांच्या तुलनेत भारतात मात्र करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६२ हजार २१२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८३७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ लाख ३२ हजार ६८१ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. देशात आतापर्यंत ६५ लाख २४ हजार ५९६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर सात लाख ९५ हजार ८७ करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १२ हजार ९९८ इतकी झाली आहे.

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. करोना प्रतिबंध करणारी लस (Coronavirus Vaccine) शोधण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधक दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. या वर्षाखेर अथवा पुढील वर्षात पहिल्या तीन महिन्यात लस भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता सिरम इन्स्टिट्यूटनं व्यक्त केली आहे.