भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ३७१ नवे करोना रुग्ण आढळले असून ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ७३ लाख ७० हजार ४६९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ८ लाख ४ हजार ५२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ६४ लाख ५३ हजार ७८० रुग्णांना उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

करोनामुळे आतापर्यंत १ लाख १२ हजार १६१ जणांना जीव गमवावा लागला आहे.

करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी ८७.३५ टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं. गुरुवारी २४ तासांत ६८० जण मृत्युमुखी पडल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ११ हजार २६६ झाला होती. मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी घटून १.५२ टक्क्य़ांवर आली आहे. देशीतल करोनाबाधितांची संख्या एकूण रुग्णांच्या ११.११ टक्के आहे.

राज्यात दिवसभरात १३ हजार ७१४ जणांची करोनावर मात
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. याचबरोबर, करोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात १३ हजार ७१४ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, आज राज्यात १० हजार २२६ नवे करोनाबाधित आढळले असून, ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहचली आहे.