जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता देशात झपाट्याने वाढतान दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळून आले. तर, ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता तब्बल ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण करोनाबाधितांपैकी १ लाख ६८ हजार २६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण १२ हजार ९४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

असं जरी असलं तरी देखील देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५३.७९ टक्के आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून उपचाराधीन व बरे झालेल्या रुग्णांमधील संख्यात्मक फरकही वाढू लागला आहे. हे पाहता करोनाविरोधात अवलंबलेले धोरण परिणामकारक असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

देशभरात ९६० वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून गेल्या २४ तासांमध्ये १ लाख ७६ हजार ९५९ नमुना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७.६७ टक्के नमुने करोनाबाधित आहेत. आत्तापर्यंत ६४ लाख २६ हजार ६२७ नमुना चाचण्या झाल्या आहेत. प्रतिदिन ३ लाख नमुना चाचण्या करण्याची क्षमता आहे.

निती आयोगाने दिल्लीतील खासगी रुग्णालयांमध्ये करोनाच्या उपचार दरांवर मर्यादा आणली आहे. करोनावर आता तुलनेत स्वस्तात उपचार घेणे शक्य होणार असल्याने दिल्लीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयातील उपचार दरांमध्ये एकतृतीयांश कपात करण्याची सूचना निती आयोगाने केली आहे. खासगी रुग्णालयांमधील ६० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जात आहेत.