जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक असे ९ हजार ९७१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २८७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ४६ हजार ६२८ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख २० हजार ४०६ रुग्ण, उपचारानंतर बरे झालेले व रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले १ लाख १९ हजार २९३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ६ हजार ९२९ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

जागतिक आकडेवारीनुसार  भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इटलीमधील रुग्णसंख्या २ लाख ३४ हजार ८१० आहे. युरोपातील देशांपैकी इटली आणि स्पेन हे देश सर्वाधिक प्रभावित झाले होते. या क्रमवारीत आठवडय़ाभरापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता. करोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये सहा लाख ७५ हजार करोनाबाधित आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियामध्ये चार लाख ५८ हजार करोनाबाधित आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या दोन लाख ८८ हजार तर यूकेमध्ये दोन लाख ८४ हजार करोनाबाधित रूग्ण आहेत.

जगात करोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत ६९ लाख ७३ हजार २४७ जणांना करोना व्हायरसने ग्रासले आहे. २१३ देशात करोना व्हायरस या महामारीने चार लाख दोन हजार ६९ जणांचे बळी घेतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३४ लाख ११ हजार ९८ जणांनी करोनावर मात केली आहे.

जगात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकामध्ये जगातील सर्वात जास्त करोनाबाधित आहेत. १९ लाख ८८ हजार अमेरिकेतील नागरिकांना करोना व्हायरसने ग्रासले आहे. तर एक लाख १२ हजार जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत अमेरिका जगात अव्वल स्थानावर असून भारत या यादीत सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या आधी या यादीत ब्राझील, रशिया, स्पेन आणि यूके या देशांचा समावेश आहे.