भारतीय वायूसेनेने पीओकेत जाऊन दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सेनेने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या ५ चौक्या उद्धवस्त झाल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकच्या सुमारे ५ चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीतील सामान्य नागरिकांच्या घरांवर उखळी तोफांचा मारा केला आहे.

संरक्षणदलाचे प्रवक्ते ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले की, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर १२ ते १५ ठिकाणी बेसुमार उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील नागरिकांच्या घरांआड नियंत्रण रेषेवर मिसाइल सोडले. त्यांनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केला.

भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर लक्ष केंद्रीत करून त्या उद्धवस्त केल्या. यात पाकच्या पाच चौक्या उद्धवस्त झाल्या असून त्यांचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान किरकोळ जखमी झाले असून त्यातील दोघांवर लष्करी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पाकिस्तानने जरी भारतीय नागरिकांच्या निवासस्थानावर गोळीबार केला असला तरी भारतीय लष्कराने पाकच्या चौक्यांनाच लक्ष्य केल्याचे आनंद यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीतील सामान्य नागरिकांच्या घरांवर उखळी तोफा डागल्या. कृष्णा गेट, करमारा, मानकोट, पुंछ परिसरातील तारकुंडी, कलाल, बाबा खोरी, कालसयान, लाम, राजुरी जिल्ह्यातील झांगर तसेच अखनूर भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात पुंछ येथील मानकोट सेक्टर येथील दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.