पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त तपास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असतानाही भारत चर्चेपासून दूर पळत असल्याचा आरोप करण्याची आगळीक पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी बुधवारी येथे केली.
पार्लमेण्टच्या संयुक्त सत्रासमोर बोलताना हुसेन यांनी, काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करून हा प्रश्न म्हणजे फाळणीचा न संपलेला अध्याय असल्याचे आणि तोच प्रादेशिक तणावाचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. पठाणकोट हल्ल्याचा तपास संयुक्तपणे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला असतानाही परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा अद्यापही स्थगित आहे, पाकिस्तानला त्याबाबत चिंता आहे, असेही हुसेन म्हणाले.
काश्मीरचा प्रश्न हा प्रादेशिक पातळीवरील तणावाचे प्रमुख कारण आहे, फाळणीच्या न संपलेल्या अध्यायाचा तो एक भाग आहे, काश्मीरमधील जनतेची इच्छा आणि संयुक्त राष्ट्रसंघातील ठराव यानुसार काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या प्रदेशातील समस्या सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे आणि सर्व देशांशी मैत्रीचे आणि बंधुत्वाचे संबंध असावेत यावर पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आधारित असावे असे आम्हाला वाटते, कोणत्याही देशाविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याची आमची इच्छा नाही, राष्ट्रीय आणि जागतिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणे सहभागी होण्याची आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
सर्व शेजारी देशांशी असलेले वाद चर्चेद्वारे सोडविण्याची इच्छा असून शांततापूर्ण संबंध पाकिस्तानला हवे आहेत, मात्र भारत पाकिस्तानशी चर्चा करण्यापासून दूर पळत आहे, असा कांगावा हुसेन यांनी केला आहे. देशातील लोकशाही बळकट झाली आहे, सर्व प्रकारचे संघर्ष ती पचवू शकते, असेही ते म्हणाले. विविध प्रकारच्या संघर्षांना तोंड देण्यासाठी आपली राजकीय यंत्रणा सक्षम आहे, असेही ते म्हणाले.